Saturday, October 27, 2007

घोडंहे असं कसं घडलं
तुझ्यावर प्रेम कसं जडलं
सरळ मार्गी जाता जाता
गाडं कसं गडगडलं
मी माझा म्हणता म्हणता
तुझाच म्हणणं कसं काय घडलं
खोटी ऐट दाखवता दाखवता
अचानक प्रेमांत कोण पडलं
आता प्रेम केलंच आहे तर
घोडं कुठे अडलं

नाही नाही म्हणता म्हणता शेवटी केलन् ना लग्न
करून करून कोण किती करील उपस्थित विघ्न

Monday, October 22, 2007

शब्द
शब्द म्हणजे बाण, एकदा का निसटला कि निसटला
शब्द म्हणजे गोळीच बंदुकीची, अनवधानानी सुटली तरी
घायाळ करतेच कधी कधी जीव सुध्दा घेते
शब्द म्हणजे सुरी काळीज कापत जातात
शब्द म्हणजे निखारे जिवाला चटके देतात
शब्द म्हणजे फुलं मन प्रसन्न करतात
शब्द म्हणजे संजीवनी जीवनदान देतात
शब्द म्हणजे मलम जखमेला गोंजारतात
शब्द म्हणजे फुंकर थंडावा देतात
शब्द म्हणजे तुषार रोमांच उभे करतात
शब्द म्हणजे संगीत मन तृप्त करतात
असे हे शब्द कडू, गोड, तिखट, आंबट
थोडे थोडे खूप जपून वापरायचे असतात.

Wednesday, October 17, 2007

क्ष


क्ष ची किंमत काढायचीय
पण हा प्रश्न जातो साय्रांनाच अवघड
कारण कुणालाच माहीत नसतं उत्तर
अन् सोडवणं जातं जड
अन् सोडवायची रीत ही नसते ठाऊक
कारण क्ष ची किंमत आपली आपली
विशिष्ट असेल कि असेल घाऊक
समीकरणांत दोन अद्न्यात असतच नाही कधी
पण........आयुष्य = आजचं वय+ क्ष

हे समीकरण कसं सोडवायचं
हा क्ष कसा काढायचा ?
किती आहे ह्याची गुणवत्ता
कांही क्षण, कांही तास, कांही दिवस कि कांही वर्ष
सारी भरलेली आहेत कशानी
दु:ख, कंटाळा, खेद की हर्ष
हे सारं कळलं तर किती बरं होईल
होईल का बरं कि होईल वाईट
जाऊद्या आता नाही सुटत तर
बरंय गुड नाइट

Tuesday, October 9, 2007

प्राजक्त , इच्छा

प्राजक्त

सहवास चांदण्यांचा मृदु-गंधयुक्त होई
या धुंद उष:काली प्राजक्त दान देई
दारी घरी पडे हा नव गालिचा फुलांचा
देहावरी फुलांची बरसात नित्य होई ।


पुष्पें नव्हेत ही तर आरास चांदण्यांची
का भूषणेंच पडती स्वर्गातल्या पय्रांची
ही ठेव देवतांची मनुजास प्राप्त होई
स्वप्नातलीच सृष्टी का वास्तवात येई ।

शुभ्रात केशरी हा मिसळून रंग जातो
मोत्यांत पोवळ्यांचा आभास सत्य होतो
मातब्बरी कशाची मग भूषणांपुढे ह्या
हे दान पदरी माझ्या बघ मावणार नाही ।

शृंगार हा शिवाचा उपहार पार्वतीला
स्वर्गीय देवतांचा आशीष हा धरेला
नंदन-वनांतुनीच हा उपवनात येई
अंगणात रुक्मिणीच्या परिजात वृष्टी होई ।इच्छा

वाय्राच्या वेगानं येऊन झपाटून टाकावं त्यानं मला
अगदी म्हणतात ना तसं उचलावं ऑफ माय फीट
गच्च गच्च घ्यावं मिठीत
अन् दिठीत मिळवावी दीठ
काय होतय ते कळण्या आधीच
घ्यावे कब्जात देह अन् प्राण
त्याच्या कवेत मी पडून राहावं
होऊन बेभान, नीरव, निश्चल, निष्प्राण

मना


माझ्या रे चंचल मना
नको होऊ सैर-भैर
थांब क्षणभर इथे
चित्त करूनिया स्थिर ।
भार प्रपंचाचा किती
वाहशील रे उगाच
त्याच्या प्रश्नांचा गुंता
सोडविता तुला धाप ।
माझे माझे करूनिया
किती जोडशील वित्त
सोड सर्व राही इथे
नको त्यांत लावू चित्त ।
ह्या देहाला जगवाया
पुरे दोनच भाकरी
नको व्यर्थ आटापिटा
नको कुणाची चाकरी ।
गेला जन्म उठाउठी
आता तरी लाव ध्यान
त्या परम ईश्वरात
तोच तुझं राखी भान।
त्याच्यातच हो रे दंग
त्याचेच करी भजन
त्याचेच तू गा अभंग
दिन रातीचं स्मरण ।
असं जेंव्हा करशील
तोच करील सांभाळ
सुखी अखंड होशील
त्याचेच तू होई बाळ ।

Friday, October 5, 2007

माणसं

माणसं

कशी कशी असतात माणसं
प्रकार प्रकार ची नेहेमीच भेटतात

कांही हळुवार मृदु जपणारी
कांही आडदांड रानटी काटेरी
कांही कडू कांही गोड
कांही तळहाताचा फोड

कांही हसतात, कांही हसवतात
कांही रडतात, कांही रडवतात
कांही भेवडावतात कांही धीर देतात
कांही पोळतात, कांही फुंकर घालतात
कांही मीठ चोळतात, कांही मलम लावतात

कांही निर्विकार, कांही विकारी
कांही अमृती, कांही विषारी
कांही नाजुक, कांही राठ
कांही बांबू सारखी ताठ
कांही दिवा होऊन मार्ग दाखवतात
कांही दिवा घालवून अंधार पसरतात

कांही घुमी, कांही बोलकी
कांही गोकुळी, कांही पोरकी
कांही शांत, कांहीचा थयथयाट
कांही गंभीर, कांहीचा खळखळाट
कांही दुधा वरली साय
कांहीचा दुसय्राच्या फाटक्यात पाय
अशी कशी असतात माणसं
प्रकार प्रकार ची नेहेमीच भेटतात

ऋ तु
वसंत
फुललेले उपवन, सुगंधी पवन
मधुकर गुंजारव, पक्षांचे आरव
प्रेम उपासना

हिरव्याची उधळण, रंगांची पखरण
वारा वासंती, राग मधुवंती
आलाप अन् ताना

मदनाचे बाण, युगुले रममाण
लेवुनिया साज, आला ऋतुराज
कार्य संचालना


ग्रीष्म

गरम गरम झळा, रणऱणतं ऊन
लाल लाल सूर्य पांढरा होऊन
घालतोय धिंगाणा

संत्रस्त धरणी, अशी याची करणी
ओसाड विहिरी, रिकाम्या घागरी
पाण्याचा ठणाणा

तापलेल्या वा़टा, झाड न फाटा
घामाच्या धारा, भिजलेला सदरा
झिजलेल्या वहाणा

वर्षा
सर सर धारा, सोसाटयाचा वारा
मंद मृद् गंध, पाण्यावर तरंग
अनिवार भावना

ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट
नदीला पूर, पाणी सर्व दूर
वादळी गर्जना

चालले वाहून दुथडी भरून
पाठारे बांध, वाहतूक बंद
माणसांची अवहेलना


शरद
संथ संथ धारा, मंद मंद वारा
नदी नाले शांत, सागर प्रशांत
सुखाची कल्पना

पूर्ण चंद्र बिंब, समोरचा लिंब
अमृत कण, चांदण्याची उधळण
धुंदीची कामना

ह्रुदय आतुर, मनांत काहूर
मनाचा हव्यास, प्रियाची आस
अस्फुटशी वेदना


शिशिर

आंगभर शिरशिरी, थंडी बोचरी
गरम गरम चहा, साय्रांना पहा
पुरतो आहेना

ऊबदार दुलई, दुधावरची मलई
कोमट ऊन, चटई घालून
जरा वेळ बसाना

शाल अन् स्वेटर जोडीला मफलर
मिळतो कुणाला, सदरा जरी असला
खूप झालं म्हणाना