Saturday, March 14, 2009

हुंदका

नेहेमीच ह्या जगाने केले हंसेच माझे
माझ्याच मग उरांत गोठले शब्द माझे ।
संधी दिलीच नाही कांहीच बोलण्याची
मग आवरू कसे मी ते ऊत भावनांचे ।
अनिवार भावना त्या डोळ्यांत दाटतात
खळ्क्न् फुटोनी कांच ते अश्रु सांडतांत ।
कढ आंत आंत जपुनि ठेवीन तप्त ज्वाला
ठरविले जरि कितीही हुंदका फुटोनी गेला ।

Friday, March 6, 2009

होळी
उधळती रंग अबीर गुलाल
गोकुळ सारे झाले लाल ।
वसंत फुलला वृक्ष वेलीं
देही लाभली नवी नव्हाळी
नैसर्गिक ती चढता लाली
झाले गाल कुणाचे लाल । उधळती...
यमुना तीरी खेळ रंगला
गोपांसव श्रीहरी दंगला
गोपीं संगे नाचे राधा
मुरली वाजवीतो नंदलाल ।उधळती...
तन धुंद अन् मन बेधुंद
लागे सर्वां एकच छंद
श्रीधर माधव गोविंद
रंगवी गोकुळास ब्रिजलाल । उधळती....

Sunday, March 1, 2009

दिनांत

संध्येच्या छटा
सागर अन् आकाश
झाला सूर्यास्त ।
अंधाराच्या गवती
चांदणीचे फूल
रात्र मलूल ।
हळू हळू येती
अनेक हसरे तारे
मध्यरात्र ।
रात्र गहिरी गहिरी
झोपली ओसरी
दिशा स्तब्ध ।
झाले झुंजुमुजु
गुलाबी केशरी
उष:काल ।