Friday, September 26, 2008

ऋतुरंग

ऋतुरंग हे माझ्या दादाचं कवितांचं पुस्तक ते आम्ही ब्लॉग वर स्कैन करून टाकायचा प्रयत्न केला होता पण नीटसं जमलं नाही आता ह्या कविता रोज एक अशा ऋतुरंग ब्लॉग वर टाकणार आहोंत. कालच पहिली कविता टाकलीय. आवडते आवाज. सोबत ऑडियो पण आहे.
प्रतिसादाची अपेक्षा आहे .

Wednesday, September 24, 2008

दूर मी जातोदूर मी जातो अता मज साद तू घालू नको
बंध हे तुटले अता त्यां गाठ तू घालू नको ।

उत्तरें देतां समाजा, लाज तुज येईल गे
जे मी केलें, ते कसें, कां, प्रश्न मज घालू नको ।

घडलेच जे अपुल्या मधे ते राहू दे गुपितांत गे
लक्तरांना प्रीतीच्या, वेशीस तू टांगू नको ।

वाट्यास जे आले म्हणावे प्राक्तनच गे आपुले
त्याच साठी ह्याला त्याला बोल तू लावू नको ।

असले जर दैवात होइल भेट ही केंव्हा तरी
वाट बघतां ओसरीला तू दिवा लावू नको ।

Friday, September 19, 2008

साखळी हायकू

मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची (हाईकूची?) कल्पना तिला सुचली.

"साखळी हायकू"साठी नियम:
१) खाली दिलेल्या सुमेधाच्या हायकूप्रमाणे तीन ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम. शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सूचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकेल.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय (ज्याच्याकडून/जिच्याकडून खॊ मिळालाय त्याची/तिची कडी) ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.

मला प्रशांत कडून खो मिळालाय. तो स्वीकारून त्यात माझी कडी ओवण्यापूर्वी सुमेधाच्या हायकूपासून माझ्यापर्यंत आलेली हायकूंची साखळी मी देत आहे. शेवटची हायकू माझी आहे. हायकू या काव्यप्रकाराबद्दल सईने तिच्या ब्लॉगवर छान माहिती दिली आहे. त्याचा उपयोग अवश्य करून घ्यावा.

माझ्यापर्यंत हायकूची साखळी आली आहे ती खालीलप्रमाणे:


रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्कम तिथेच हरवला!
(इति सुमेधा)
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
(इति चक्रपाणि)
कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी
(प्रशांत)


हायकूच्या या साखळीतली माझी कडी:

जुनं पुस्तक उघडतांच
पडला एक वाळका गुलाब
आता त्या सारखाच प्रेमांत उरला नाही आब

माझा खो मेघनाला अन् सुषमाला

Friday, September 5, 2008

आठवणी

आठवणींच्या रिमझिम धारा
देती तप्त जिवा थंडावा
त्यातच मग हरवून जाता
वर्तमान कां नच विसरावा

बालपणीचे घरकुल अपुले
आई दादा ताई भाई
आणि छबकडे मिंदू नाना
गडबड बडबड घाई घाई

मी अन अण्णा अधले मधले
कुणी ही थापटा असले तबले
पण त्या कडुलिंबी फांदी ला
लोंबत असत मधाचे बुधले

ते बालपण ती तरुणाई
नव्या नव्या ची किती नवलाई
शाळा संपुन कधी उगवली
कॉलेजाची अपूर्वाई

ती कॉलेजाची नवलाई
कळले नाही कधी संपली
कधी सीनीयर झालो आम्ही
अन् पदवी ही हाती पडली

अन् पदव्युत्तर वधू परीक्षा
तीही पडली पार कधीची
सून, नववधू , काकू, वहिनी
नवीन नातीं नव जन्माची

नवरा,सासू तान्ही बाळें
उस्तवारी करणें सगळ्यांची
त्याच मधे मग हरपुन गेली
गंमत जंमत ती रात्रींची

हे सगळे करताना आले
नोकरी चे ते जू मानेवर
कधी स्वत: मी अडकवले ते
माझे मला न कळे आजवर

शिक्षण अन् लग्ने ही मुलांची
झाली ती थाटामाटाने
ती ही पाखरें उडून गेली
अपुल्या अपुल्या नव वाटेने

आज अता निवांत लाभता
आम्ही दोघे सायंकाळी
आठवीत बसतो त्या गोष्टी
घडल्या होत्या ज्या सकाळी

संसृतिच्या स्थूलांत कधी कधी
स्मृति मधाचे बिंदु चाखतो
गोडी मध्ये आठवणींच्या
दोघे मग हरवून जातो.