Tuesday, December 18, 2007

आयुष्य

आयुष्य म्हणजे असतं तरी काय
आयुष्य असतो इतिहास
तारखा वार सण
दिवस मास सण
युध्द झुंजी मरण
य़श, अपयश, स्मरण
उत्कर्ष, -हास, हास, परिहास
आयुष्य असतो इतिहास

आयुष्य असतं गणित
बेरजां पेक्षा वजाबाक्या जास्त
गुणाकारा पेक्षा भागाकार म्हणणे रास्त
आयुष्याची समीकरणं सोडवता सोडवता
संपून जातात, आयुष्याची पानं
अवघड, कठिण, जटिल
आयुष्य असतं गणित

आयुष्य असतं साहित्य
अश्रुंची फुलेच जिथे उमलतात
शोकांतिका जास्त फुलतात
कधी कधी होतो विनोद सा-याच जीवनाचा
कविता फक्त स्वप्नातच डुलतात
अन् कल्पनेतच राहून जातं लालित्य
आयुष्य असतं साहित्य

आयुष्य असतं राजकारण
ज्याचं त्याचं आपलं समीकरण
डाव पेच हार जीत
कधी पट कधी चीत
सत्ते साठी जोड तोड
पैशा साठी सारे गोड
सारंच अद्भुत असाधारण
आयुष्य असतं राजकारण

आयुष्य असते तडजोड
आयुष्य असते घडामोड
आयुष्य असते हसू
आयुष्य असते आँसू
आयुष्य असतो आरसा
आयुष्य असतो कवडसा
आयुष्य असतं रेशमी जाळं
ज्यात जखडला असतो मनुष्य
असं हे आयुष्य.

Saturday, December 8, 2007

पाऊस

कधी टप टप कधी तुषार
कधी धो धो मुसळधार
कधी सप सप सप वारा
कधी धड धड धड गारा

कधी नदी नाले तुडुंब
कधी सारे चिंब चिंब
कधी रिमझिम सुखद गार
कधी लागे सतत धार

कधी गर्जे घोर गगन
कधी बिजलीचे नर्तन
कधी वादळी गडगडाट
अन् विद्युति कडकडाट

कधी आणी थंडावा
कधी माजवी बंडावा
कधी आणी महापूर
कधी राही दूर दूर

Saturday, December 1, 2007

हात

माझे हात आता सुंदर दिसत नाहीत
कुरूपच दिसतात म्हणाना
उभारलेल्या नसा, सुरकुतलेती कातडी
झिजलेली कडक नखं
पण मला ते सुंदरच वाटतात कारण
माझं ह्या हातांवर खूप प्रेम आहे
जन्मभर ते माझ्याकरता झिजले
फाय़ली उपसल्या, लिहिलं, केर काढले,

भांडी घासली, कपडे धुतले, भाज्या चिरल्या,
कणिक भिजवली, पोळ्या लाटल्या,
अन् अजूनही ते न कुरकुरता हे सारं करतात
शिवण ही शिवतात कधी कधी
ते म्हणत नाहीत कि आम्ही थकलो
मीच म्हणते मी थकले
माझ्या आज्ञेचा अवकाश
कि ते लगेच कामाला लागतात
अशा ह्या हातांवर मी कां बर प्रेम करू नये
मी मी म्हणून जी काही आहे ती ह्यांच्याच मुळे ना