Wednesday, November 21, 2007

प्रवास

कसा असेल तो प्रवास आजवर कधीच न केलेला
ज्ञाता कडून अज्ञाता कडे गेलेला

कोणचं असेल ते वाहन जे नेईल गंतव्या कडे
तिथे जाणारे रस्ते असतील सरळ की वाकडे

प्रकाश असेल का वाटेत कि असेल फक्त अंधार
शून्यच असेल कि असेल एखादा तरी विचार

भेटतील का तिथे ती सारी जी गेलीत जिवाला चटका लावून

कि होत्याच्या नव्हत्यात जाईन मी ही विरून

अन् तो भेटेल का तिथे मला, तो ज्ञानोबाचा विठ्ठल
तो व्यासांचा कृष्ण तो रखुमा देवीचा वर

ज्यानी सांगितलंय गीतेत कि सारे त्याच्याच कडे येतात
माना वा न माना त्याच्यातच विलय पावतात

Wednesday, November 14, 2007

तू


तुझ्या प्रीतीचा भाव मला वेढून टाकतो हळुवार
एखाद्या मंद सुगंधा सारखा वाय्रावरून दरवळत येतो,
सप्त सुरांच्या लयीत मला गुगवून ठेवतो, अन्
तुझ्या पैंजणांच्या तालावर मी नाचत राहातो मनोमनी
तुझ्या येण्याचा विचार करतो रोमांच उभे अंग भर
तुझ्या ओढणीचा स्पर्श जागवतो शृंगार
तुझ्या पदचापांच्या रवाने तृप्त होतात कान
जागते हुरहूर ह्रदयात कि तू येणार
दार वाजतंय ते उघडलं कि तुझा हसरा चेहेरा
दाराच्या चौकटीत दिसणार
माझ्या डोळ्यांचं पारणं फिटणार
अन् मान वेळावून तू म्हणणार
किती हा वेळ !

Tuesday, November 6, 2007

दीपावली अभिनन्दन


आज अंगणात पृथ्वीने घातली प्रकाश रांगोळी
धरेवर स्वर्गच अवतरला अशा ह्या दिव्यांच्या ओळी
मनें ही प्रमुदित स्नेहाने कशी ही भावना भोळी
आज अभिनन्दन सर्वांचे गड्यांनो आली दिपवाळी

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .

Friday, November 2, 2007

कोपरा



माझ्या मनातला एक कोपरा
राखून ठेवलाय मी खास माझ्या साठी
त्या कोपय्रात राहाते एक मुलगी
बालिश अल्लड भोळी
तिच्यातलं लहानपण ओसंडून वाहू देते मी
जपून ठेवते तिची नव्हाळी
माझ्या जवळ येत जाणाय्रा वार्धक्याची
तिला लागू देत नाही मी चाहूल
तिचं कैशोर्य़ आणि तारुण्य
तिला उपभोगू देते खुशाल
तिच्या गगनाला गवसणी घालण्याच्या
महत्वाकांक्षांना घालते खत पाणी
अन् तिचा विकास बघून सुखावते मनोमनी
मला असाच ठेवायचाय हा कोपरा
खास माझा फक्त माझ्या साठी.