Thursday, March 1, 2012

जीवनाचे सार

विसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,
प्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा ।

काय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,
राहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा ।

भावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि
अन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा ।

विसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया
घे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा ।

सौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी
मी सुखी होईन मित्रा, तू ही सुखी होवून जा ।

सर्व काही होत नसते, वाटते व्हावे जसे,
जीवनाचे सार हे, तू ही सख्या समजून जा ।

भेट झाली जीवनी जर फिरुनि केंव्हा तरी
मित्र म्हणुनच भेटू या, प्रीतिला विसरून जा ।