Sunday, November 25, 2012

कांही क्षणिका


क्षितिजा वर सूर्य बिंब
चाललं सागरांत
संपली भेट


संध्यारंग उधळले
सोनेरी लाल गुलाबी
जातानांच हसू


येणार लांब रात्र
पण असेल चंद्र
तुझी आठवण


पेंगुळली गात्रे
नीज तरी ना ये
कशी ही असोशी


पक्षांची किलबिल
मनाची चलबिचल
होणार का भेट ।

गर्दी गडबड
वाहने जोरात
मनाच्या वेगीं


कामा ची लगबग
जिवाची तगमग
आहेस का तू


बॉस ची वर्दी
डेडलाइन ची गर्दी
कुठली भेट ।

Saturday, October 6, 2012

बाळ


बाळ हसरं हसरं
माझं लाडाचं झिपरं
त्याचे काळे भोर डोळे
नाक नकटं अपरं ।

त्याचे मऊ मऊ गाल
पाय हात मऊ मऊ
सायी सरखं ग अंग
किती किती पापे घेऊ ।

दंगा करी किती बाळ
नाचे वाजवीत वाळा
झोप नाही ग डोळ्याला
करी सारा वेळ चाळा ।

माझा गोविंद गोपाळ
करी दही दूध काला
तीट लावा हळू गाली
दृष्ट नच लागो ह्याला ।

Saturday, September 8, 2012

प्रश्न आणि उत्तरंकिती आणि कसं, कुठे आणि केंव्हा
कधी आणि कुणी काय करावं
कसे कसे पडतात प्रश्न मनाला

कुणी द्यावी त्याची उत्तरं
कुणालाच तर माहीत नसतांत
मग सगळं आपलं अनुमान

खरं खरं रोक ठोक काहींच नाही
काय करावं, शोधावी उत्तरं कि
चालू द्यावं सर्व जसं चाललंय

मिटून कवाडं बाहेरची
डोकावलं आंत, तर
मिळतील ती उत्तरं


Thursday, June 21, 2012

रीत


आज अचानक पाहिलं तर घरटं रिकाम होतं
परवा परवा पर्यंत तर मोठं होत आलेलं एक पिलू त्यात होतं
माझी चाहूल लागताच उडून जाणारी त्याची आई
त्याला प्रेमाने दाणा भरवायची .
मी पण काळजी घ्यायची पावलांचा आवाज होऊ नये ह्याची.
कधी कधी खिडकीच्या काचेतून बघायची
लहानशी चोच मोठ्ठी उघडून
दाणा घ्यायच्या प्रयत्नांत असलेल ते पिलू .
मला नादच लागला होता त्याचा,
पक्षिणिचं ते संगोपन बघायचा.
दिवसे दिवस मोठं होत जाणारं
ते पिलु बघायचा.
दोनच दिवस मधे गेले
जमलंच नाही ते बघायला
अन् आज घरटं रिकामं
किती जरी मला ओकं बोकं वाटलं
तरी रीतच आहे ही जीवनाची
माझी ही पिलं उडून नाही का गेली ?

Tuesday, April 17, 2012

क्षितिजाच्या पलीकडे

तुझी दुःखाची तलम चादर
त्यांत विणलेली शब्दांची कोमल फुलें
हात लावायला धजावत नाही मन
पण एक अपूर्व आकर्षण मात्र वाटतं
संध्याकाळची गूढ वेळ अन् तिचं तुझं नातं
नितांत वैयक्तिक पण तरीही
केंव्हा तरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारं
ती तलम चादर पांघरूनच वावरलास सदैव
अचानक् एका दुपारी मात्र फेकून दिलीस ती चादर
अन निघून गेलास क्षितिजाच्या पलीकडे ।

Thursday, March 1, 2012

जीवनाचे सार

विसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,
प्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा ।

काय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,
राहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा ।

भावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि
अन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा ।

विसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया
घे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा ।

सौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी
मी सुखी होईन मित्रा, तू ही सुखी होवून जा ।

सर्व काही होत नसते, वाटते व्हावे जसे,
जीवनाचे सार हे, तू ही सख्या समजून जा ।

भेट झाली जीवनी जर फिरुनि केंव्हा तरी
मित्र म्हणुनच भेटू या, प्रीतिला विसरून जा ।