Saturday, November 14, 2009

एखादा दिवस

एखादा दिवस असा येतो
जेंव्हां सार जमून जातं
सकाळी दार उघडून गच्चीवर आलं कि
कुंडीतलं उमलेलं गुलाबाचं फूल हसून स्वागत करतं
चहा झक्क जमलाय असं आपल्या मनांत येतं न येतं
तोच पतिराजां ची सूचक मान हलते
भाजी वाला ताजी भाजी देतो
पोस्टमन हवं असलेलं पत्र आणतो ( हवी ती ई-मेल येते)
कामं ठरवून बाहेर पडलं कि ती हमखास होतात
अतिशय प्रिय मैत्रिण अचानक भेटते
संध्याकाळ चा खास पदार्थ मस्त जमतो
जेवायला बाहेरच जाउया असं ठरतं
एकादा झक्क सिनेमा, मस्त जेवण अन मीठा पान
असं साधून झोपायला जाताना मनांत विचार डोकावतो
आज आपला वाढदिवस तर नव्हता ?

Monday, November 9, 2009

आशा निराशा

सर्रकन् ढगांनी भराव आभाळ
अन् काळ्या काळ्या अभ्रांनी
सूर्यास झाकून टाकावं
तशीच झाकोळते निराशा मनाला
अन् ग्रासून टाकते सारे प्रसन्न विचार ।

ह्रदय कसं मलूल पडतं
अन् चेहेरा चिंतातुर
कां ? कसं ? कुठे ? केंव्हां ?
प्रश्नांच्या उत्तरांना मन आतुर ।

पण हे सर्व ही सोसायचंय धीरानं
कारण ढगा आडून सूर्य येतोच बाहेर
तसंच निराशेचं हे मळभ होणारच दूर
अन् आशेचा सूर्य देणारच आहेर ।

Monday, November 2, 2009

एकचि तो भगवान

एक ध्यास, एक ध्यान
एक मन एक प्राण ।
एक ठेव, एक देव
त्याची किती तरी नाव ।
त्याला तुम्ही म्हणा कृष्णा
तोचि तृप्ती, तोचि तृष्णा ।
त्याला म्हणावे का राम
देतो जिवाला आराम ।
त्याला म्हणू या शंकर
तोचि सखा निरंतर
त्याला म्हणावे का हरी
फुंकी प्राणाची बासरी ।
कोणी त्याला म्हणे दत्त
सदा त्याच्या पायी चित्त ।
त्याला विठ्ठल म्हणूया
गुण गाउनी वर्णू या ।
जरी माया असे हवी
तिला मानावे का देवी ।
अंबा तुळजा लक्ष्मी
सदा वसतात मनी ।
मरियम पुत्र येशू म्हणा
बुध्द, महम्मद, माना ।
एक सर्व माझ्या लेखी
भाव असूद्या अनेकी ।
नावें किती विद्यमान
एकचि तो भगवान ।