Thursday, September 27, 2007

क्षणिका-१
जिचं लिखाण संजीवक ती लेखणी
जिच्या कडे पुन्हा पुन्हा बघावसं वाटेल ती देखणी
जिच्या किरणांत तेज ती हिरकणी
अन् जी चटकन सरकेल ती चटकणी


पापणी लवता न लवता जातो तो क्षण
जमिनी वर सांडला कि उचलता येत नाही तो कण
एखाद्याला जिंकता येतो साय्रांना नाही तो पण
अन् अचानक जिव्हारी बसतो तो घण

खळ खळ पाण्या सारखं ओसंडून वाहातं ते जीवन
पतंगा सारखं उंच उंच जातं ते जीवन
वाय्राच्या झुळुकां बरोबर डौलांत डुलतं ते जीवन
अन् आई च्या कुशीत गोड गोड हसतं ते जीवन


न बोलता कळतं ते प्रेम
न सांगता जाणतं ते प्रेम
आपल्यातलं जे गुपित ते प्रेम
सर्वांचच असतं सेम सेम

Monday, September 24, 2007

क्षणिका


प्रेम

प्रेम कशाला म्हणायचं
कुणावर तरी त्यानं कां बसायचं
खोटं खोट रुसायचं
उगाच उगाच हसायचं
कधी कधी झुरायचं
अन अचानक हुरळून जायचं

तू

श्वास निश्वास
अंधार प्रकाश
पृथ्वी आकाश
जीवन मृत्यु
साय्रातच आहेस
एकटा तू

मन

मन ही काय अजब चीज आहे
सिल्क सारखं झुळझुळीत
अन पाय्रा सारखं सुळसुळीत
कशानं बेटं खूष होईल अन् कशानं उदास
त्याचं काही खरं नाही हेच खास

सुख


सुख कशाला म्हणायचं
काय आहे त्याची परिभाषा
जे काय आजकाल होतंय
आपल्याशी जे काय घडतंय
तेच बरं तेच सुख आशा

मोक्ष


कधी कधी वाटतं
माणसाचं नुसतं मनच असावं
शरीर असूच नये
केव्हढं स्वातंत्र्य असेल मग
हवं ते करायचं
हवं तिथे जायचं
हवं तसं जगायचं
मोक्ष मोक्ष म्हणतात तो हाच असावा
दुसरं काही त्यानं असूच नये


मुखवटे

इथून तिथून सारं सारखंच
माणसा माणसांत बिनसायचंच
बिनसलं तरी नीटच आहे असं भासवायचं
अन् मुखवटे लावून सारय्रांनी फिरायचं

हा क्षण


काल आज उद्या कशाला मोजायचं
हा क्षण आपलाय ह्यातच जगायचं
सारं सारं उपभोगायचं
अन् पुन्हा नवीन क्षणांत जायचं

Saturday, September 22, 2007

सायंकाळीसायंकाळी
कोण्या एका सायंकाळी,
संध्येच्या रंगीत छटा त्या
रांगोळीच्या प्रतिमा ,सागर
लाटांवरती उभवित होत्या

अन त्या रंग छटा गालांवर
तुझ्या ही प्रिये उमलत होत्या
होता हा संध्या प्रताप की
निसर्ग प्रेमा फुलवित होता

घरट्याला परतती पाखरें
चिवचिवाट तो त्यांचा कानी
अन तू हळुच दिलेली मजला
त्या समयी ती प्रेम निशाणी

अन त्या सागर लाटांवरती
मिळून दोघे होतो विहरत
अस्फुट अस्फुट गोड गोड तू
होती बोलत लाजत लाजत

काय बोल होते ते तेंव्हा
ऐकत कान जिवाचा करुनी
होतो मी, पण डोळे माझे
तव चेहेय्रावर होते खिळुनी

चेहेय्रा वरचे भाव निरखता
मन माझे ही रंगत गेले
मी पण ह्रुदय आपुले हळवे
अलगद तुझिया हाती दिधले


त्या प्रेमाची अशी सांगता
होइल वाटत नव्हते कधिही
तू अन मी पती पत्नी झालो
आवडले नियतीला हे ही

पती पत्नी होताच मिळाले
हक्क एकमेकां छळण्याचे
दुसय्राचे अधिकार तुडवुनी
अपुले प्रस्थापित करण्याचे

त्या नाजुक हळुवार भावना
संसृति तापे करपुन गेल्या
दूध चहा साखर अन भाजी
पै पाहुणा आला गेला

रेशन राकेलाच्या रांगा
बस गाडीची धक्का बुक्की
संध्याकाळी घरी येताना
मरगळली तू चुरगळला मी

हिशेब पै पै चा जोडुनि
हाती कधिहि न काही आले
अधल्या, चवल्या, अन आणेल्या
रुपये कुठले कधीहि न उरले

आज अचानक सायंकाळी
गॅलरीत कपबशा घेउनि
संध्या-रंग समोर विखुरले
चहा पीत असता तू अन मी


लाल, गुलाबी अन सोनेरी
कुठे मधूनच धूसर धूसर
बघता बघता गत काळाशी
मन माझे एक रूप झर झर

अन त्या ओल्या जुन्य भावना
पुन्हा नव्याने उसळुनि आल्या
अन प्रेमाने हाती घेउनि
हात तुझा मी उगा दाबला

गणपती वंदनगणपती वंदन


नमस्ते विघ्न विनाशका
गणाधिपा गण नायका
विद्याधरा सुखदायका
मज देई सुबुध्दी विनायका


डोळ्यांनी भक्तांस नित्य जपतो
सोंडे हि कुरवाळितो
भक्तांचे अपराघ पोटि धरितो
करुणाच वर्षावितो
शञूचा पाडाव तोचि करितो
भक्तांसि जो रक्षितो
तो माझा गणपती मी नित्य भजतो
आशिर्वचा मागतो