Sunday, March 30, 2008

चांद कातला

चांद कातला कुणि धरणी वर
फिरवुनि तिजला गरगर भरभर
ढग अचंभित बघत राहिले
सोनेरी चंदेरी झालर


रात्र स्तब्ध ती उभी राहिली
सावरून पदराला तत्पर
तारे धावती सैरा वैरा
न सुचून कांहीही भर भर

चांद कातला कुणि धरणीवर

हळू हळू तो चांद विरतसे
अर्ध शाम अष्टमीस वावर
आणि अमावास्येला बेटया
खुशाल काळा बुरखा पांघर

अन् मग सूर्य आपुला सुंदर
फिरवित येई सोनेरी कर
अन् अपुल्या शाश्वत मायेने
उजळी हळु हळु काळा चंदर

दरदिशि थोडा थोडा उजळित
चांद हळु हळु मोठा होई
पोर्णिमेस संपूर्ण उजळिता
प्राप्त करी निज स्वरूप सुंदर

चांद उजळतो कोण धऱेवर
चांद काततो कोण धरेवर

Monday, March 24, 2008

देह अन् प्राण

देहाच्या डबीतला प्राणांचा कापूर
केंव्हा आणि कसा उडून जातो कळत
सुध्दा नाही
डबीचं झाकण उघडं राहातं नकळत
कण कण उडत राहातो नकळत
अन् फक्त डबीच उरते
ती फेकूनच द्यावी लागते शेवटी

Tuesday, March 18, 2008

वाजते बासरी

वाजते बासरी यमुना तीरी
रंग उधळती दश-दिशां वरी

गोपी सा-या रंग खेळती
घेउनि पिचकारी करी
बघतो कौतुक श्रीहरि । वाजते बासरी…

भिजती साड्या भिजती चोळ्या
भिजती गात्रे सारी
उठती मनीं आनंद लहरी । वाजते बासरी…

प्रीत रंग मग असा उसळता
मग्न सर्व नर नारी
नसे चित्त भानावरी । वाजते बासरी….


या अपूर्व रंगात नाहती
राधा अन् गिरिधारी
नाचते गोकुळ ताला वरी । वाजते बासरी…