Tuesday, June 16, 2009

पाऊस

पावसाळी आसमंत
कसे भरुनि आले
निळे, सावळे, काळे
ढग खवळुनि आले ।

करती गर्जना प्रचंड
वा-याचा अन् मृदंग
मत्त हत्तीच जणु
डुलत झुलत आले ।

गडगडाट, कडकडाट,
चमचमाट, लखलखाट
तडिता चाबुक उडवित
वरुण देव आले ।

कोसळती जलधारा
अन् प्रचंड तो वारा
जल थल जणु होय एक
तन, नव वसन ल्याले ।

शमले वादळ अवचित्
दिशादिशा हो पुलकित्
अभ्र छेदुनि,
रविराज प्रगट झाले ।

Wednesday, June 10, 2009

इच्छा

बाई ला अनुभव असतोच
सर्व जाणतं सोडून अजाणत्याला वरण्याचा
तोच कामी येईल बहुतेक आता येतांना तुझ्याकडे
पुरुषाला जातं त्यापेक्षा कदाचित
सोप जाईल हे जग सोडून जाणं
अन् त्या सर्वस्वी अनोख्या जगांत पाय ठेवणं
मी कल्पना करते त्या पेक्षा किती वेगळा
असू शकतोस तू
कि माझ्या कल्पनेतलाच साकार होणारेस ?
मला जाताना, हे बंध तोडतांना
किती कष्ट व्हावेत असं ठरवलं आहेस ?
किती कां असेनात, सहन होऊ दे म्हणजे झालं
आता वेळ जवळ येऊन ठेपलीय
सर्व सोडण्याची.
तेंव्हा शात पणे तुझं नाव घेत घेतच
तुझ्या कडे येणं व्हावं हीच इच्छा.