Thursday, August 19, 2010

प्राप्य

माझे मला मिळाले जे काहीं प्राप्य होते
मग आज ही कशाला ईर्षा फुकाच होते ।
जो तोच गुंतलेला व्यापात आज अपुल्या
त्यांना उगाच माझे ओझे कशास होते ।
हे भोग शरीरि माझ्या, सरतील ही उद्याला
जखमा मनांत ओल्या कुणि कां उगाच देते ।
माझेच कर्म सारे माझ्या समोर आले
मग आज मी अकारण अशी कां उदास होते ।
देशात गांजलेली जनता उपाशी असता
चापून मेजवानी, निजती खुशाल नेते ।
आतंक आज व्यापी देशास सर्व दूर
तरी किती, कुठे, कुणाला, रे काळजी रहाते ।
नुसता विचार करुनी घडणार नाही कांही
चल ऊठ अता मित्रा, ये घडवू देशातें ।

Tuesday, August 3, 2010

नगण्य



असलो जरी कण धुळिचा
एकदा चमकेन लखकन्
असलो जरि तृण इवले
पाउलां जाईन सुखवुन ।
ह्या अफाट ब्रम्हांडी
नगण्य अस्तित्व जरी
सहवासी होणा-यां
देईन साथ रसरसून ।
जरी जग हे बदलाया
पडतिल बाहू अपुरे
मुंगीच्या एव्हढा
प्रयास नक्की घडविन ।
जरी माझे नाव कुठे
दिसणार नाही कुणा
पण माझा हातभार
गेला असेल स्पर्शुन ।
अन् जग हे सोडतां
अश्रू न ढाळो कुणि ही
पण माझ्या चेहे-या वर
समाधान नक्की पसरिन ।

Thursday, July 15, 2010

अंत वेळी



कसं आहे रूप तुझं, कसा आहे रंग
कसा आहे भाव तुझा, कसा तुझा ढंग ।
कसा आहे सूर तुझा, कसा तुझा ताल,
कसा नाचवितो आम्हा,कशी तुझी चाल ।
कसं आहे मन तुझं, कसे हाव भाव
कुठे आहे घर तुझं, काय तुझा गाव ।
कसं आहे हसू तुझं कसे आंसू तुझे
साग ना जातात कसे रात दिन तुझे ।
होतो का रे कधी तरी आमचा आठव
उघडतोस का आठवणींचा साठव ।
भजतोय आम्ही तुला आळवितो अती
पण तुझ्या कानीं त्यातलं जातंय किती ।
ये रे ये रे आता नको पाहू ना रे अंत
अंत वेळी येशील ना, न राहो काही खंत ।

Tuesday, April 6, 2010

किती तरी

किति तरी चालून आलोय
पण किती अजून चालायचंय ?
कुणा साठी काय काय
किती तरी करायचंय ।
आयुष्य तर जगून झालंय
पण मनातलं सांगायचंय
आयुष्यावर किती तरी
कुणाशी तरी बोलायचंय ।
संपत आलीय वाट वाटतंय
तरी ही अजून चालायचंय
सोबतीचे सारे सोडून
एकटयानेच पुढे व्हायचंय ।
तरीही प्रत्येक दिवशी
उत्साहानं उठायचंय
आजचा दिवस शेवटचा
असंच समजून जगायचंय ।

Thursday, March 18, 2010

वसा

नसेल बोलायचं तर राहा उगीच
नसेल सांगायचं तर नको सांगूस
पण आहेत मला परिचयाचे
मनाचे सारे कंगोरे, आयुष्याच्या वाटे वरचे
खांच खळगे
सारखंच असतं ग प्रत्येकीचं
थोडा फारच असतो फरक
कुठे अधिक तर कुठे उणं
कुठे एकटंच तर कुठे दुणं
ओळखता येतील मला व्यथा तुझ्या अंतरीच्या
त्या करता साल सोलून ह्रदय थरथरत ठेवण्यची
गरज नाहीये
शेवटी आपण घेतलेला वसा एकच आहे ना ?

Saturday, January 23, 2010

क्षणिका थंडीच्या

ढगांची दुलई पांघरून
सूर्य अजून लोळतोय
कर्मयोगा ची वाट लावतोय ।

धुक्या ची कुल्फी मलई
काठो काठ भरून
आकाशच करतंय एन्जॉय
किरण चमचा धरून ।

कुठे शेकोटी कुठे हीटर
कुठे सेंट्रल हीटिंग धाववतंय मीटर
पण रस्त्यावरच ज्यांच बेडरूम
त्यांच्या साठी सरकारच झालंय चीटर ।

गारठलेल्या हातांनी
तू कुरवाळायचीस
तेंव्हा तुझा किती राग यायचा
थंड लागतंय ग असं म्हणायचा
आज सारखं वाटतंय तो स्पर्श व्हावा
पण आई तू ह्या थंडी गरमी च्या पलीकडे
कां बरं निघून गेलीस ।

Monday, December 14, 2009

क्षणिका

ठिणगी
मनाच्या सोपाना वरून
ह्रदया च्या गाभा-यात उतरलाय सूर्य
आंत बाहेर दाटून राहिलाय फक्त प्रकाश
ह्या प्रकाश पर्वात मीही झालेय एक ठिणगी ।

कविता
काळ्या काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करावी
तसे मनांत विचार
लखकन् वीज चमकावी तशी येते कल्पना
अन् सर सर पाउस यावा तशी येते कविता ।

निर्बंध मन
बेधुंद निर्बंध पावसाळी नदी सारखं
ओढाळ मन
प्रेमाच्या अनावर वा-या नी झपाटलेलं
पूर ओसरल्यावर त्या नदीच्या परिसरा सारखंच
सर्व उध्वस्त करून जाणारं ।