Tuesday, January 29, 2008

किमया


चांदण्याचे पंख लागलेय आज मनाला
उमलले आहेत लाखो लाख गुलाब
श्रावणाच्या धारांत नाहून निघालय बेटं मन
लोळतंय हिरवळीवर खुशाल चाखत कोवळं ऊन
सारे सारे शब्द पडताहेत कानावर अमृत होऊन
सा-यांच्या नजरा करताहेत वर्षाव प्रेमाचा
कशाची ही किमया कशाची ही जादू
कुणाला विचारू कुणाला सांगू
पण गरजच नाहीय त्याची
जाणतेय मीच माझी
आज होणाराय ना आपली भेट
संध्याकाळ पासून रात्री पर्यंत थेट.

Sunday, January 20, 2008

माझं मन

माझं मन व्हावं विशाल अंगण
खेळावी त्यात माझी नाती गोती

माझं मन व्हावं चिमणं पाखरू
भरा-या माराव्या दूर दूर किती


माझं मन व्हावं शीतल चांदणं
सुखवावं त्यांना जवळ जे येती

माझं मन व्हावं सूर्याचा किरण
पोचवावी ऊब जिथे गोठलीय प्रीति

माझं मन व्हावं हिरवी हिरवळ
क्षुब्ध नयनी थंडावा आणावा अति

माझं मन व्हावं गगनाची निळाई
अपार जयाचा विस्तार किती

माझं मन व्हावं सागर अथांग
सामावून घ्याव्या सा-या रीती नीति

माझं मन व्हावं तरल तरल
आणि मला यावी त्याचीच प्रचीति