Thursday, November 4, 2010

दिवाळी

काळी जरतारी रात्र
रात्र अशी अवसेची
लख लख लाख दिवे
रात्र भासे दिवसाची ।
दारी तोरण स्वागता
अंगणांत रंगावली
शोभे आकाश कंदील
अन् दिव्यांच्या आवली ।
पूजेची तयारी सारी
फुलें उदबत्त्या दिवे
पंच पक्वान्नाची ताटे
गंध, सुगंध बरवे ।
नववधू लक्षुमी ही
आज सजली झोकांत
नाकी नथ, गळा सरी
तोडे, पाटल्या हातांत ।
पैठणी ल्यायली नवी
मोर राघू सजलेले
सासू सासरे दीरांच्या
नेत्री कौतुक दाटले ।
आनंदी आनंद माझ्या
अंगणात ही मावेना
ओसंडून वाही सुख
त्याचा जोर सोसवेना ।
आज दिवाळी च्या दिनी
तुला मागते लक्षुमी
घरी दारी सर्व दूर
राहो आनंद दाटूनी ।
दृष्ट न लागो कुणाची
माझ्या सुखाच्या संसारी
राहो सर्वजण सुखी
माझे घरी अन् शेजारी ।

Monday, October 4, 2010

मन

मन सुसाट पळते
मला नको तिथे नेते
नको नको मी म्हणता
नको तेच दाखवते ।

मन माजवते मनीं
किती काहूर काहूर
नाही नही ते विचार
करून हुर हूर ।

मन किती हे चपळ
जसे हरिण हरिण
क्षणि इथे क्षणि तिथे
ह्याचे कठिण कठिण ।

मन नाठाळ नदी से
वाहावते दूर दूर
बांध तोडून आणते
सर्वत्र महापूर ।

मन वा-या संगे नाचे
मन भिजे पावसांत
मन कधि हो ढगाळ
कधी तापते उन्हांत ।

ह्या मनाचे नाही खरे
ह्याचा लागेच ना ठाव
कधी वाटे जवळचे
कधी राखे दुजा भाव ।

Saturday, September 11, 2010

गणपति बाप्पा मोरया



लागला रे होता केंव्हांचाच ध्यास
आज माझी आस पुरविली ।
किती दिवसांनी आला देवा घरी
आनंद संसारी दाटियेला ।
यावे यावे देवा, स्वागत तुमचे
दाराशी तोरण नारळाचे ।
पाया वर घालू दूध आणि पाणी
प्रवासाचा शीण घालवाया ।
आसन देऊन स्थापना करूया
मखर सुंदर सजविले ।
सुगंधी जलाने स्नान करवू या
नवी आभरणें तुज लागी ।
चंदनाची उटी कस्तुरी तिलक
मस्तकी शोभती जवा फुले ।
दुर्वांची जुडी देईल थंडावा
मोदक प्रसादा ठेवियले ।
पूजा, प्रार्थना, धूपाचा सुगंध
आरती ओवाळू पंचदीप ।
गोड हे मानावे, आतिथ्य रे बाप्पा
आता तूज घालू दंडवत ।

Saturday, September 4, 2010

पाऊस कविता

’प्रशांत’नं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि ’क्रांती”ला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम खाली दिले आहेत. ’क्रांती’ने तिची साखळी जोडून पुढचा डाव ’प्राजू’,’राघव’,’जयवी’ आणि माझ्या (’गोळे काका’ यांच्या) हाती तिची सूत्रे दिली.

मी माझी साखळी जोडून, आशा जोगळेकर आणि तुषार जोशी यांना खो देत आहे.

पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....

मग करायची‌ सुरुवात?

प्रशांतचे कडवं - (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब

प्रशाआंतचा खो -चक्रपाणि, क्रांती, आशाताई, अ सेन मन यांना

क्रांतीचे उत्तर, छंद तोच, भुजंगप्रयात

खुळ्या पावसाला किती आवरू रे?
सरी श्रावणाच्या कशा पांघरू रे?
निळे सावळे मेघ येती छळाया,
सख्या, दूर तू, मी कशी सावरू रे?

गोळे काकांचे उत्तर, छंद तोच. भुजंगप्रयात!

नको पावसा कोसळू तू असा रे
किती घोर लावून जाशी असा रे
पुरे जाहले, ने पुढे सर्व वारे
जरा राजसा थांब आता कसा रे

.तुषार चे उत्तर छंद भुजंग प्रयात्

कुणी पावसाला म्हणे येत जारे
कुणाला सरीने सजण आठवे रे
कुणी गातसे पावसा थांब आता
अशी पावसाची अनोखीच गाथा

तुषार चा खो सई, चैताली, अनुराधा आणि शब्दसखा यांना.

माझे उत्तर. छंद तोच भुजंग प्रयात

सख्या पावसा तू असा रे कसा रे
तुला साथ देती हे उन्मत्त वारे
कधी ध्वस्त करशी जगाचा पसारा
कधी वर्षसी अमृताच्याच धारा ।

माझा खो चैताली,महक आणि शामली ला

महक चे उत्तर
कसे आवरू मी , या पाउस वेड्या मनाला
ओल्या मातीचा गंध मोहवतो त्याला
जीव कंठश्च होई,वाट पाहे क्षणा क्षणाला
लवकर येण्याचा निरोप दे, माझिया साजणाला.
http://mehhekk.wordpress.com/

Thursday, August 19, 2010

प्राप्य

माझे मला मिळाले जे काहीं प्राप्य होते
मग आज ही कशाला ईर्षा फुकाच होते ।
जो तोच गुंतलेला व्यापात आज अपुल्या
त्यांना उगाच माझे ओझे कशास होते ।
हे भोग शरीरि माझ्या, सरतील ही उद्याला
जखमा मनांत ओल्या कुणि कां उगाच देते ।
माझेच कर्म सारे माझ्या समोर आले
मग आज मी अकारण अशी कां उदास होते ।
देशात गांजलेली जनता उपाशी असता
चापून मेजवानी, निजती खुशाल नेते ।
आतंक आज व्यापी देशास सर्व दूर
तरी किती, कुठे, कुणाला, रे काळजी रहाते ।
नुसता विचार करुनी घडणार नाही कांही
चल ऊठ अता मित्रा, ये घडवू देशातें ।

Tuesday, August 3, 2010

नगण्य



असलो जरी कण धुळिचा
एकदा चमकेन लखकन्
असलो जरि तृण इवले
पाउलां जाईन सुखवुन ।
ह्या अफाट ब्रम्हांडी
नगण्य अस्तित्व जरी
सहवासी होणा-यां
देईन साथ रसरसून ।
जरी जग हे बदलाया
पडतिल बाहू अपुरे
मुंगीच्या एव्हढा
प्रयास नक्की घडविन ।
जरी माझे नाव कुठे
दिसणार नाही कुणा
पण माझा हातभार
गेला असेल स्पर्शुन ।
अन् जग हे सोडतां
अश्रू न ढाळो कुणि ही
पण माझ्या चेहे-या वर
समाधान नक्की पसरिन ।

Thursday, July 15, 2010

अंत वेळी



कसं आहे रूप तुझं, कसा आहे रंग
कसा आहे भाव तुझा, कसा तुझा ढंग ।
कसा आहे सूर तुझा, कसा तुझा ताल,
कसा नाचवितो आम्हा,कशी तुझी चाल ।
कसं आहे मन तुझं, कसे हाव भाव
कुठे आहे घर तुझं, काय तुझा गाव ।
कसं आहे हसू तुझं कसे आंसू तुझे
साग ना जातात कसे रात दिन तुझे ।
होतो का रे कधी तरी आमचा आठव
उघडतोस का आठवणींचा साठव ।
भजतोय आम्ही तुला आळवितो अती
पण तुझ्या कानीं त्यातलं जातंय किती ।
ये रे ये रे आता नको पाहू ना रे अंत
अंत वेळी येशील ना, न राहो काही खंत ।

Tuesday, April 6, 2010

किती तरी

किति तरी चालून आलोय
पण किती अजून चालायचंय ?
कुणा साठी काय काय
किती तरी करायचंय ।
आयुष्य तर जगून झालंय
पण मनातलं सांगायचंय
आयुष्यावर किती तरी
कुणाशी तरी बोलायचंय ।
संपत आलीय वाट वाटतंय
तरी ही अजून चालायचंय
सोबतीचे सारे सोडून
एकटयानेच पुढे व्हायचंय ।
तरीही प्रत्येक दिवशी
उत्साहानं उठायचंय
आजचा दिवस शेवटचा
असंच समजून जगायचंय ।

Thursday, March 18, 2010

वसा

नसेल बोलायचं तर राहा उगीच
नसेल सांगायचं तर नको सांगूस
पण आहेत मला परिचयाचे
मनाचे सारे कंगोरे, आयुष्याच्या वाटे वरचे
खांच खळगे
सारखंच असतं ग प्रत्येकीचं
थोडा फारच असतो फरक
कुठे अधिक तर कुठे उणं
कुठे एकटंच तर कुठे दुणं
ओळखता येतील मला व्यथा तुझ्या अंतरीच्या
त्या करता साल सोलून ह्रदय थरथरत ठेवण्यची
गरज नाहीये
शेवटी आपण घेतलेला वसा एकच आहे ना ?

Saturday, January 23, 2010

क्षणिका थंडीच्या

ढगांची दुलई पांघरून
सूर्य अजून लोळतोय
कर्मयोगा ची वाट लावतोय ।

धुक्या ची कुल्फी मलई
काठो काठ भरून
आकाशच करतंय एन्जॉय
किरण चमचा धरून ।

कुठे शेकोटी कुठे हीटर
कुठे सेंट्रल हीटिंग धाववतंय मीटर
पण रस्त्यावरच ज्यांच बेडरूम
त्यांच्या साठी सरकारच झालंय चीटर ।

गारठलेल्या हातांनी
तू कुरवाळायचीस
तेंव्हा तुझा किती राग यायचा
थंड लागतंय ग असं म्हणायचा
आज सारखं वाटतंय तो स्पर्श व्हावा
पण आई तू ह्या थंडी गरमी च्या पलीकडे
कां बरं निघून गेलीस ।