Monday, August 17, 2009

बाळ

बाळ खोड्याळ खोड्याळ
बाळ खट्याळ खट्याळ
बाळ अती खोडया करी
तरी किती लडिवाळ ।

तिचे मोठे मोठे डोळे
भारि लाडिक नि भोळे
उडते भुरु भरु
तिचे रेशमी जावळ ।

रेशमी अंगडे
अन रेशमी सोवळ
हाती पायी अलंकार
अन् गळ्यात पोवळ ।

बाळ खुदुखुदु हासे
चमकती दातुरड्या
कोवळ्या ओठी दिसे
दूध रेषा ती धवल ।

न लागावी ग हिला
बाई कोणाची नजर
तीट लावा झणि गाली
आणि उतरा भाकर ।

Thursday, August 6, 2009

लेवून भूषणें ये ना


लेवून भूषणें ये ना
वेढून चांदणे ये ना
त्या तिथे नदी तीरा वर
बघू स्वप्न देखणें, ये ना ।

कधी वसंत, ग्रीष्म कधी
वर्षाऋतु, शरद कधी
प्रीती चे गूज तुझ्या
कानांत सांगणे, ये ना । लेवून....

अवखळ हसु गालांवर
उडता उन्मुक्त पदर
भिरभिरती धुंद नज़र
तोडून बंधने, ये ना । लेवून....

मोकळाच केश पाश
चालू नको सावकाश
वा-याची पाउलांत
बांधून पैंजणें, ये ना । लेवून....

हात तुझा दे हाती
गात्रें कशी थरथरती
हळुवार भावनांनी
अस्फुट बोलणें, ये ना । लेवून....