Sunday, November 6, 2011

प्रेमाला रंग असावा



प्रेमाला रंग असावा,
प्रेमाला गंध असावा,
प्रेम मन मोरच व्हावा,
थुई थुई नाचत जावा ।

अंगणी जुई फुलावी,
पारिजात वृष्टी व्हावी,
वा-याच्या झुळुके सरसा
टप,टप,टप पाउस यावा ।

गुलाबी अन सोनेरी,
चांदण्या सम चंदेरी,
हरळीच्या हिरवाईसा
चहूकडे पसरत जावा ।

सोनेरी सकाळ व्हावी,
रुपेरी रात्र असावी,
केशरी सायंकाळी
अचानक प्रियकर यावा ।

पक्षांची किलबिल गाणी,
भ्रमरांची मधु गुणगुणणी
प्रेमाचा मृदु कलरव तो
ह्रदयी अनुनादत रहावा ।

Saturday, August 6, 2011

आठवणींच्या चिमण्या



आठवणींच्या चिमण्या
भिरभिरतात मनाच्या अंगणांत
टिपतात दाणे मागल्या क्षणांचे,
दिवसांचे, महिन्यांचे अन वर्षांचे सुध्दा .
केंव्हा घेतला होता आईनं पापा
गालांवरचे अश्रू पुसून
किंवा दिला होता निळा पेन बाबांनी
मला आवडतो म्हणून
केंव्हा ऐकता ऐकता वाटलं होतं
अपरूप दादाच्या कवितांचं
केंव्हा वाटली होती असूया
अक्काची न बोलता सारं कळण्याची
केंव्हा केली होती अण्णाशी भांडा भांडी
केंव्हा घातला होता मिंदू ला धपाटा
केंव्हा गैलरीतून बघितलं होतं त्या देखण्याला
केंव्हा पुढे केला होता बोरं भरला हात
केंव्हा झालं होतं कौतुक, अन्
केंव्हा झाला होता राग राग.
केंव्हा पडल्या होत्या अक्षता अन् कळसाचं पाणी
केंव्हां फुलली होती बाग
केंव्हा लावलं होतं प्रेमाचं रोप
केव्हा बहरलं ते फुला फळांनी
चिमण्या बाळाच्या चिमण्या मुठी
पावलांच्या मऊ मऊ करंज्या
काजळ, तीट, जॉन्सन बेबी पावडर,
अमूल स्प्रे
वाढती पाउलं, लहान होणारे बूट,कपडे
त्यांचं मोठं अन वेगळं होणं
किती किती दाणे संपतच नाहीत
मीच येते अचानक भानावर, अन् येते अंगणातून घरांत .

Saturday, March 5, 2011

आस

रात्रीतल्या सुरांचे आवर्त क्षीण झाले
माझे ही हात थकले अन् ताल स्तब्ध झाले ।

शब्दच पेंगुळले, आवाज ते विराले
अन् नाद ब्रम्ह अवघे जणु काय मूक झाले ।

कुठल्या सुरेल गावीं, ही पाखरे स्वरांची
गेली उडून आणि हे गाव दग्ध झाले ।

ही शांतता भकास जाणीव गोठलेली
हे बधिर मूक कुठले गावांत आज आले ।

गेलीस तू निघून, मी एकटाच उरलो
अस्तित्व आज माझे मी ही नकारलेले ।

कुठल्याही क्षणि ते येतील स्वर फिरून
येशील तू ही गात ते गीत विसरलेले ।

ही आस मम मनांत बघ तेवतेच आहे
तू ही तिला पुरव ना ते स्नेह राखलेले ।