Sunday, May 24, 2009

अभ्र

कुठुनि अभ्र आले,
नभ, झाकोळुनि गेले
सूर्याचे तेज कसे
मंद मलूल झाले ।

मन फ्रफुल्ल होते ते
क्षण भरांत विझले
स्मित गालावरचे
जणु मावळून गेले ।

अपुल्या मधि जे घडले
किति सुंदर होते
फक्त एक वाक्य तुझे,
ह्रदयी डसुन गेले ।

धागा धागा मिळुनी
प्रेम गोफ विणला
पण अखेर तट,तट,तट
बंध तुटुनि गेले ।

होते जर दु:ख नशिबी
अपुल्या प्रेमाच्या
मग कशास सप्तरंगी
स्वप्न पडुनि गेले ।

Wednesday, May 6, 2009

मत

कुणाला द्यावं मत कुणाला देऊ नये ?
कुणाच्या हाती द्यावी सत्ता, कुणाला देऊ नये ?
पण निरर्थक आहे हा विचार आता
निर्णय घेण्याची वेळ केंव्हांच संपलीय
आता फक्त निकालाची प्रतीक्षा
कोण होणार भारत भाग्य विधाता
ह्या वेळी केलेल्या चुकांची नोंद घ्यायची
रोज त्यांची उजळणी करायची
मग तरी पुढच्या वेळी
बरोबर निर्णय घ्यायला
जमेल आपल्याला
अन् पश्चात्तापाची
वेळ नाही यायची.