Monday, February 16, 2009

ग्रंथ आणि जिद्द

किती भीति घालतात हे ग्रंथ
भीती वार्धक्याची, अर्थहीनतेची, शक्ती--हासाची
लोळागोळा होत जाणा-या शरीराची
एका बाजूनी म्हणतात आत्मा शुध्द आहे
त्याच्यावर वाईटाचं किटाळ चढतच नाही कधी
अन् दुस-या बाजूनी भीती घालतात शरीराच्या नश्वरतेची
पाप पुण्याची, स्वर्ग नरकाची
अरे असेना का हे शरीर नश्वर, त्यांतलं मन किती छान आहे
किती भावुक, किती हळवं,किती तरुण, किती रसरसून जगणारं
तेच देईल शक्ती ह्या शरीराच्या व्यथा सोसण्याची
अन् तरीही उभं राहाण्याची शेवट पर्यंत जिद्दीनं .

Tuesday, February 3, 2009

प्रीत

सागर हा निळा आकाश ही निळं
तुझ्या डोळियांचं तळ
मीच मीन ।
शामल ढगांची आकाशात गर्दी
मीच एक दर्दी
कुंतलांचा ।
दोन क्षण भेट जिना उतरता
तुझ्याशी बोलता
लागे धाप ।
कशी ही प्रीती कुणावरी जडे
प्रेमाचे हे तिढे
न सुटती ।
मनांत न मावे आनंदी आनंद
एकच हा छंद
तव भेटीचा ।
माझ्याच सारखी तू ही कासावीस
मला तू हवीस
अन् तुला मी ।