विसरते बघ मी तुला, तूही मला विसरून जा ,
प्रीतिच्या त्या आठवांना बासनी बांधून जा ।
काय केले, काय झाले, चूक माझी की तुझी,
राहू दे ना प्रश्न सारे, उत्तरें विसरून जा ।
भावनांची जळमटें तीं टाक आता झाडुनि
अन् नव्याने जीवनाला तू पुन्हा सामोर जा ।
विसरून जा तू ते तराणे गायलेले मिळुनिया
घे नवे स्वर, अन् नव्या दिवसांत तू हरवून जा ।
सौख्य कांही जीवनी आले तुझ्या हे ऐकुनी
मी सुखी होईन मित्रा, तू ही सुखी होवून जा ।
सर्व काही होत नसते, वाटते व्हावे जसे,
जीवनाचे सार हे, तू ही सख्या समजून जा ।
भेट झाली जीवनी जर फिरुनि केंव्हा तरी
मित्र म्हणुनच भेटू या, प्रीतिला विसरून जा ।
Thursday, March 1, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
विसरून जा...विसरणे जर शक्य असते तर...!खूपच छान कृति!
अप्रतिम! पण अशक्य!
ते असू दे हृदयी, जन्मभरी प्रेम माझे
माझ्यातले अंश तुझे, असेच ठेवून जा...
संपतील श्वास जेव्हा, उरेल घटका एक आणि
एक आसू मजसाठी, धरेवरी सांडून जा...
मी मागते हे अवघड, असेल परी हे शक्य
त्या प्रेमाची शपथ तुला, अशक्य सारे घडवून जा...
जाशील तू जेव्हाही, असेन मी जिथे जिथे
किर्तीरूपी बहुरंगी, अस्तित्त्व तुझे ठेवून जा...!
Ekdam chhan
Post a Comment