रात्र सावळी सुंदर
काळाभोर केशभार
नेसे काळी चंद्रकळा
हिरे मोती अलंकार।
कोण तिचा प्रियकर
कोणा साठी हा श्रृंगार
कोणाची पाहते वाट
आहे कोण तो येणार।
रात्र जागविते रात्र
पुन्हा वेळावते मान
आला का घेते चाहूल
दश दिशा झाल्या कान।
वाट पाहून पाहून
निशा राणि पेंगुळली
आणि तिच्या प्रांगणात
उषा सुंदरी पातली।
आत आला रविराज
भेटे प्रिय उषा राणि
दिवसाची सुरवात
होते त्यांच्याच मीलनी।
चालतसे लपंडाव
रात्र दिवसाचा असा
रविराज येता येता
करते प्रयाण निशा।