Wednesday, July 30, 2008

भीती

रोज रोज भेडसावतात मला अज्ञाताच्या सावल्या
ह्रदयाची स्पंदनं वाढू लागतात दुप्पट वेगानं
अन् ते छातीतून बाहेर उडी घ्यायला बघतं
सावल्या आंत आंत आंत शिरतात
अगदी ह्र्दयाच्या गाभा-यात
मोठ्ठया, मोठ्ठया, मोठ्ठया होतात
मी हतबल, भिंतीला टेकून उभी
छप्पर कोसळण्याची वाट बघत.....
एक आवाज येतोय
असं काय करतेस, कशाला एव्हढी घाबरतेस,
ह्या सावल्या तूच तयार केल्यास, तुझ्याच मनाने
अन् तूच त्या घालवू शकशील. तुझ्यातच आहे ती शक्ती
पायातल्या मणा मणाच्या बेडया गळून पडतात
मी खिडकी उघडते
सावल्या लहान, लहान, लहान होत जातात
अगदी एक ठिपका. अन् तोही शेवटी नाहीसा होतो
मी निश्वास सोडते.
कुठे तरी ओठावर एक बारीक स्मित उमटतं.

Thursday, July 24, 2008

मनातला विठ्ठल

आषाढी कार्तीकी भक्तजन येती, त्या वारीचं आकर्षण लहानपणा पासून होतं असं म्हणता
येणार नाही, कारण बालपण, तारुण्य अन् मोठेपण सर्वच महाराष्ट्राच्या बाहेर गेलं.
नास्तिक मात्र नव्हते. माहेरी घरांत गोकुळ अष्टमी दणक्यात साजरी व्हायची. सासरी गणपती.
पण संत वाङमयातून घडलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाने विठ्ठलाचं कुतुहल मात्र खूप होतं.
वारीला गेलेल्या लोकां कडून वारी विषयी ऐकतांना वाटायचं निसंगपणाचां किती छान अनुभव
असेल हा. अन् विनम्र होण्याची तर अपूर्व संधी कारण आपलं असं काहीच न्यायचं नसतं म्हणे.
पण तो योग तर आलाच नाही पुढे कधी आला तर कुणास ठाऊक .
विठ्ठलाचं ते आकर्षण मात्र आजही कायम आहे.माझे माहेर पंढरी हा तुकारामांचा
भीमसेनां नी गायलेला अभंग ऐकला कि जीव हेलावून जातो. पंढरपूर ला मात्र दोनदा जायचा योग आला.
बडग्यांचा मात्र आम्हाला अजिबात त्रास झाला नाही. तुळशी माळ हातात घेऊन रांगेत उभं असतांना
इतकं प्रसन्न वाटत होतं. पाय मुळीच दुखले नाहीत अन् नंबर लागल्यावर विठूच्या पायावर डोकं ठेवून
अगदी भरून आलं. पण रखुमाई विठ्ठलाजवळ नव्हती. ती दुस-या देवळांत आपल्या विठोबा पासून दूर असते.
स्त्री मुक्ती प्रकार तेंवहा पासूनच चालू झाला होता कि काय. विठ्ठलाच्या देवळात एक चांदीचा खांब आहे
त्याला कवेत घेऊन अगदी गळाभेट देता येते. मी विठ्ठलाला भेटणयाची ही संधी अर्थातच् सोडली नाही.
ज्ञानेश्वरीचं हस्तलिखित ही तिथेच ठेवलेलं आहे. ज्या वास्तूला ज्ञानदेव तुकाराम वगैरे मंडळींचे पाय लागले
त्याच वास्तूत आपण आत्ता उभे आहोंत ही कल्पनाच किती छान आहे मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव काय वर्णावा.
नामदेवांच्या हातून तर विठू माउली खात ही असे. अन् जनाबाईला घरकामांत मदत करणारा तो हाच. असा हा
सामान्यांना असामान्य बनविणारा विठ्ठल मनांत नाही वसला तरच आश्चर्य. नेहेमी जवळचा वाटणारा विठ्ठल
तुकारामांना कधी कधी मात्र कानडा (समजायला कठिण) वाटतो. अन् कधी कधी अगदी मित्र कि ज्याच्यावर त्यांना
रागावता ही येतं.
एवढ्या प्रसिध्द मंदिराच्या आसपासचा परिसर अन् चंद्रभागा नदी मात्र अगदी गचाळ आहे. त्यामुळे
मन कुठेतरी खट्टू होईन जातं. पण मनांत त्या विठ्ठल भेटीचं सुख ही बरोबर असतंच.

Friday, July 11, 2008

हातभार

किती तरी हात सरसावतात पाटी वर लिहायला
पण त्यांना पेन्सिलच मिळत नाही .
किती तरी डोळे उत्सुक असतात पुस्तकांतली अक्षरं वाचायला
पण त्यांना पुस्तकंच मिळत नाहीत
किती तरी कान आसुसले असतात चांगल्या गोष्टी एकायला
पण त्यांना आजीच भेटत नाही .
किती तरी ओठ आतुरले असतात कांही तरी सांगायला
पण त्यांचं कुणी ऐकूनच घेत नाही.
किती तरी पाय तयार असतात उडी मारून पुढे जायला
पण त्यांना कुणी हातच देत नाही .
किती तरी मनं आतुर असतात लाड करून घ्यायला
पण त्यांना आईच सापडत नाही
आपण व्हायचं त्यांची आई, आज्जी, द्यायचा त्याना हात
द्यायची पाटी पेन्सिल पुस्तकं
लावायचा हातभार जमेल तेव्हढा ?

Thursday, June 12, 2008

म्हातारपण

म्हातारपणात ही सुख असतं
सुख कशाची ही घाई नसण्याचं
सुख सर्व कांही आरामशीर करण्याचं
सुख नातवंडांना दिसामाशी मोठं होतांना बघण्याचं













सुख कशाचीच जबाबदारी नसण्याचं
सुख पूर्वी केलेल्या कष्टांची फळं चाखण्याचं
सुख नवीन पिढी कडून आदर मिळविण्याचं
सुख भेगाळलेल्या टाचांवर मलम लावत बसण्याच्या निवांत पणाचं
सुख दुपारी पुस्तक घेऊन लोळत पडण्याचं
म्हातारणातही सुख असतं, फक्त ते मजे मजेनं भोगता यायला हवं.

Saturday, May 17, 2008

गम्मतिका

टाप टाप हायहील सेंडल्स
खाड खाड पायातले बूट
सपक सपक हवाई चप्पल
धाड धाड रेल्वेचा रूट

सुनामी, सायक्लोन, भूकंप
आज ह्याचा तर उद्या त्याचा संप
कशी आमची आठवण धडाची
सारे विसरून मारतो पुढे जंप


तुझ्या डोळ्यातली निरांजनं
तुझ्या गालावरचे अनार
तुझ्या हास्याच्या फुलबाज्या
माझी तर रोजच दिवाळी होणार

कडा कडा भांडतं ते प्रेम
भडाभडा बोलतं ते प्रेम
ढसाढसा रडतं ते प्रेम
अन् रडता रडता हसतं ते प्रेम

मी माझं मला
तू तुझं तुला
ते त्यांचं त्यांना
आपण आपलं आपल्याला


'टीप मागची कविता थोडी भारी वाटली ना म्हणून ह्या अगदीच हलक्या फुलक्या गम्मतिका ।

Sunday, April 27, 2008

सुख निर्वाणी


नसावी इच्छा नसावी आकांक्षा
तृप्त असावं मन
नसावा द्वेष नसावी ईर्षा
शांत असावं मन


आल्या दिवसाचं करावं उत्साहानं स्वागत
उत्साही असावं मन

आनंदानं करावं पडेल ते काम
ओतावं त्यांत तन, मन, धन

वेगळी कांही ध्यान धारणा करण्याचं
उरणारच नाही मग कांही कारण
मन आनंदी असल्यावर
बाकी सारंच असेल अकारण
ब्रह्मानंदा चा अनुभव लाभेल क्षणो क्षणी
अनिर्वचनीय सुख लाभेल निर्वाणी

Monday, April 14, 2008

राम

संसार ताप विकलित, भक्तांस्तव सुखद मेघ
भुज विशाल, धनुधारी, एक वचन दगड रेघ
सुस्मित वदन, करुण ह्रदय, भक्तांचा कैवारी
सुर नर मुनि दुख हर्ता, रिपु राक्षस संहारी

राम नाम सीता-पति, विना कारण कृपाळ
आर्त ह्रदय भक्तांचा शीतल चंदन दयाळ
आदर्शच मूर्तीमंत रघुपति जो जगत्पाळ
तन, मन, धन जो अर्पी करि त्याचा तो सांभाळ

देह दिला करण्याला काम नित्य प्रति क्षणी
कारण अन् कार्य सर्व अर्पावे राम चरणी
चिंता भव-भय सारे होइल मग दूर झणि
आनंदच आनंद राहील भरुन तनी मनी