Thursday, October 15, 2009

दिवाळी


घोर तिमिरात अवसेच्या
दिवे उजळू मांगल्याचे
संवादाच्या प्रकाशाने
घालवू अंधार अ-समजांचे ।
झटकू जाळी द्वेषा ची
झाडुन काढू राग लोभा
घालू रांगोळी सुखाची
सडा शिंपू सु- बोलांचा ।
मग सुख येइल दारी
लक्षुमि येईल माहेरी
आनंदाच्या प्रकाशांत
होइल दिवाळी साजरी ।

Sunday, September 20, 2009

शक्ति याचना

भद्र काली, महादुर्गा, हिमनंदिनि नमो नमः
दैत्य असुर संहारिणि, भक्त रक्षिणि नमो नमः
शक्तिरूपा, दैन्य हर्ती, शत्रु ताडिनि, नमो नमः
भक्तांस्तव आशिर्वच, दे शक्ति नमो नमः ।

आसुरि रंगात रंगले,राज्यकर्ते नमो नमः
सैन्यशक्ति, खड्ग,भाले गंजलेले नमो नमः
मोहाने डोळे ह्यांचे तारवटले नमो नमः
औढुनि आसूड करी जागृत ह्यां नमो नमः ।

शत्रु दारांत ठेपले, आंतहि लपले नमो नमः
जन सारे नाच-गाण्यांत रंगले नमो नमः
कशास्तव माझेच हे अंतर जळे नमो नमः
जागवून चेतना यां करि जागृत नमो नमः ।

पुन्हा एकदा वाहू दे वारे देश भक्तीचे
पुन्हा एकदा स्फुरु दे बाहु युवा शक्तीचे
नेत्यांना मिळू दे कसब नीति युक्ती चे
पुन्हा एकदा उजळो भाग्य या भारती चे ।

भद्र काली, महादुर्गा, हिमनंदिनि नमो नमः
दैत्य असुर संहारिणि, भक्त रक्षिणि नमो नमः

Monday, August 17, 2009

बाळ

बाळ खोड्याळ खोड्याळ
बाळ खट्याळ खट्याळ
बाळ अती खोडया करी
तरी किती लडिवाळ ।

तिचे मोठे मोठे डोळे
भारि लाडिक नि भोळे
उडते भुरु भरु
तिचे रेशमी जावळ ।

रेशमी अंगडे
अन रेशमी सोवळ
हाती पायी अलंकार
अन् गळ्यात पोवळ ।

बाळ खुदुखुदु हासे
चमकती दातुरड्या
कोवळ्या ओठी दिसे
दूध रेषा ती धवल ।

न लागावी ग हिला
बाई कोणाची नजर
तीट लावा झणि गाली
आणि उतरा भाकर ।

Thursday, August 6, 2009

लेवून भूषणें ये ना


लेवून भूषणें ये ना
वेढून चांदणे ये ना
त्या तिथे नदी तीरा वर
बघू स्वप्न देखणें, ये ना ।

कधी वसंत, ग्रीष्म कधी
वर्षाऋतु, शरद कधी
प्रीती चे गूज तुझ्या
कानांत सांगणे, ये ना । लेवून....

अवखळ हसु गालांवर
उडता उन्मुक्त पदर
भिरभिरती धुंद नज़र
तोडून बंधने, ये ना । लेवून....

मोकळाच केश पाश
चालू नको सावकाश
वा-याची पाउलांत
बांधून पैंजणें, ये ना । लेवून....

हात तुझा दे हाती
गात्रें कशी थरथरती
हळुवार भावनांनी
अस्फुट बोलणें, ये ना । लेवून....

Thursday, July 16, 2009

मनातल्या मनांत

मनातल्या मनांत मी
मनातल्या मनांत तू
प्रीत कळ्या फुलविल्या
प्रेम ज्योति लाविल्या
न च तू आली कधी
न मज बोलाविलेस तू । मनातल्या मनांत
कधी हसुन पाहिले
कधी नजर चोरली
कधी हळूच लाजली
कधी गंभीर जाहली
पण मनातले खुळे
भाव जपलेस तू । मनातल्या मनांत
कधी तुझ्या वाटेत मी
कधी लाटेत राहिलो
पुस्तकें देण्या मिशें
स्पर्श इच्छित राहिलो
साहस नच केले कधी
न येवो मनांत किंतु । मनांतल्या मनांत
कधी तरी होईल सत्य
स्वप्न हें मनातले
जे जपुन ठेविले
आंत ह्रदयातले
कधी तरी येऊन जवळ
माझीच रहाशील तू । मनातल्या मनांत

Tuesday, June 16, 2009

पाऊस

पावसाळी आसमंत
कसे भरुनि आले
निळे, सावळे, काळे
ढग खवळुनि आले ।

करती गर्जना प्रचंड
वा-याचा अन् मृदंग
मत्त हत्तीच जणु
डुलत झुलत आले ।

गडगडाट, कडकडाट,
चमचमाट, लखलखाट
तडिता चाबुक उडवित
वरुण देव आले ।

कोसळती जलधारा
अन् प्रचंड तो वारा
जल थल जणु होय एक
तन, नव वसन ल्याले ।

शमले वादळ अवचित्
दिशादिशा हो पुलकित्
अभ्र छेदुनि,
रविराज प्रगट झाले ।

Wednesday, June 10, 2009

इच्छा

बाई ला अनुभव असतोच
सर्व जाणतं सोडून अजाणत्याला वरण्याचा
तोच कामी येईल बहुतेक आता येतांना तुझ्याकडे
पुरुषाला जातं त्यापेक्षा कदाचित
सोप जाईल हे जग सोडून जाणं
अन् त्या सर्वस्वी अनोख्या जगांत पाय ठेवणं
मी कल्पना करते त्या पेक्षा किती वेगळा
असू शकतोस तू
कि माझ्या कल्पनेतलाच साकार होणारेस ?
मला जाताना, हे बंध तोडतांना
किती कष्ट व्हावेत असं ठरवलं आहेस ?
किती कां असेनात, सहन होऊ दे म्हणजे झालं
आता वेळ जवळ येऊन ठेपलीय
सर्व सोडण्याची.
तेंव्हा शात पणे तुझं नाव घेत घेतच
तुझ्या कडे येणं व्हावं हीच इच्छा.