Saturday, May 23, 2015

नातीं



नात्यांना जपावं हळुवार
ती असतात
बकुळ फुलां सारखी
कोमेजली तरी
सुवासच देतात।

नात्यां करता
घ्यावी थोडी तोशीस
झिजावं चंदना सारखं
मग ती कसा सुगंध
पसरतात।

नाती जपावी पुस्तकातल्या
गुलाबा सारखी
मग कधी तरी
तीं आठवणींचा
ओलावा देऊन जातात।

नाती ठेवावीत ताजी
मनांतल्या ओलाव्यात
मग ती कशी अलगद
उमलतात।

ही मनाची नाती जोपासावीत
कधी मधी मग
भेट जेंव्हा व्हावी
कसा अचानक आनंद
देऊन जातात।








Tuesday, June 17, 2014

रात्र आणि दिवस














रात्र सावळी सुंदर
काळाभोर केशभार
नेसे काळी चंद्रकळा
हिरे मोती अलंकार।

कोण तिचा प्रियकर
कोणा साठी हा श्रृंगार
कोणाची पाहते वाट
आहे कोण तो येणार।

रात्र जागविते रात्र
पुन्हा वेळावते मान
आला का घेते चाहूल
दश दिशा झाल्या कान।

वाट पाहून पाहून
निशा राणि पेंगुळली
आणि तिच्या प्रांगणात
उषा सुंदरी पातली।

आत आला रविराज
भेटे प्रिय उषा राणि
दिवसाची सुरवात
होते त्यांच्याच मीलनी।

चालतसे लपंडाव
रात्र दिवसाचा असा
रविराज येता येता
करते प्रयाण निशा।


Tuesday, May 13, 2014

कोवळा अंकुर

कोवळा अंकुर आहे ग मी आई तुझ्या कुशीतली
तुझ्या सारखीच होणार ना मी ही स्त्री सखी जगातली
नको ना कुणाला खुडायला देऊ, सांभाळ गS स्वतःला
येऊ दे, येऊ दे, येऊ दे ना आई ह्या तुझ्या जगी मला।
प्रकाशात नाहू दे
श्वास मोठा घेऊ दे
तुला पाहू दे ना डोळे भरून
मांडीवर झोपू दे
सायी चे हात तुझे
फिरव ग अंगा वरून।

तुझे धरुनि बोट
चालीन मी वाट
घेईन अवघे जग जिंकून
तू मला मी तुला
दोघी एकमेकी ला
सांभाळू आधार देऊन
तू आत्ता येऊ दे मला
स्मरीन मी ही हे उपकार
अन् जेंव्हा तुला लागेल मदत
सांभाळीन मी ही तुला।

Saturday, August 3, 2013

तोचि आहे सुख

तोचि आहे सुख, दुःख आहे तोचि,
तोचि रे सुंदर, कुरूप ही तोचि ।

तोच बुध्दिमान, गावंढा ही तोचि,
तोचि रे नागर, ग्रामस्थ ही तोचि ।

तोचि रे सरळ, वाकुडा ही तोचि,
तोचि रे कठोर, मृदुल ही तोचि ।

तोचि सदाचारी दुर्जन ही तोचि,
तोचि खल कामी, सज्जन ही तोचि ।

क्रोध,काम, मद, मत्सर ही तोचि
लोभ, मोह, राग, प्रेम रस तोचि ।

तोचि आहे अग्नि, जळ आहे तोचि,
पृथ्वी, वायु, नभ सर्व आहे तोचि ।

अंतरिक्ष आणि पाताळ ही तोचि
सर्व ह्या जगाचा प्रतिपाळ तोचि

तोचि आहे तू अन् मी ही आहे तोचि
अखिल जगती भरला रे तोचि । 

Wednesday, March 27, 2013

होळी




उधळित रग गुलाल कन्हैया खेळे होळी
गोकुळ हे झाले दंग, भरली मस्ती ची झोळी  ।

राधिका वाचवित अंग गोपिंच्या आड होतसे
सावरी त्वरेने पदर, झाकते ओली चोळी ।

पिचकारी उडवित येति गोप अन कृष्ण मुरारी
धावती गोपीं च्या पाठी मोडती नीटस ओळी ।

हा रास रंग पाहुनि लोक हे भान विसरले
जय जय हो राधा-कृष्ण, बोलती एकच बोली ।

कृष्ण रंगी भिजती आज पहा सारे ब्रिजवासी
जाहले कृष्णमय जगत, भक्ती ची पिकली पोळी ।

Sunday, November 25, 2012

कांही क्षणिका


क्षितिजा वर सूर्य बिंब
चाललं सागरांत
संपली भेट


संध्यारंग उधळले
सोनेरी लाल गुलाबी
जातानांच हसू


येणार लांब रात्र
पण असेल चंद्र
तुझी आठवण


पेंगुळली गात्रे
नीज तरी ना ये
कशी ही असोशी


पक्षांची किलबिल
मनाची चलबिचल
होणार का भेट ।

गर्दी गडबड
वाहने जोरात
मनाच्या वेगीं


कामा ची लगबग
जिवाची तगमग
आहेस का तू


बॉस ची वर्दी
डेडलाइन ची गर्दी
कुठली भेट ।

Saturday, October 6, 2012

बाळ


बाळ हसरं हसरं
माझं लाडाचं झिपरं
त्याचे काळे भोर डोळे
नाक नकटं अपरं ।

त्याचे मऊ मऊ गाल
पाय हात मऊ मऊ
सायी सरखं ग अंग
किती किती पापे घेऊ ।

दंगा करी किती बाळ
नाचे वाजवीत वाळा
झोप नाही ग डोळ्याला
करी सारा वेळ चाळा ।

माझा गोविंद गोपाळ
करी दही दूध काला
तीट लावा हळू गाली
दृष्ट नच लागो ह्याला ।