Monday, February 4, 2008

साद

हलकेच घातलेली ती साद आली कानी
अन् दूर वर कुठेशी ती शीळ घुमली रानी
रानात पाखरांनी केलाच किलबिलाट
अन् आम्र-मंजरींनी केली सुगंधी वाट
बघ वाहू लागला तो स्वच्छंद मंद वारा
पाण्यास स्पर्शुनी तो कां थरथरे किनारा

त्या हरिण शावकांनी केल्यात उंच माना
कोकीळ ही सुरेल त्या घेऊ लागे ताना
अन् कोवळे किरण हे बघ उजळती धरेला
त्या केशरी छटा ही रंगतात अंबराला
ही प्रीत तुझी माझी का भावली निसर्गा
जणु हात धरित्रीचे बघ टेकलेत स्वर्गा
हे भाव विश्व अपुले ह्रदयात जपुनि ठेवी
मग स्वप्निच्या फुलांना सुगंध मंद येई

4 comments:

Sneha said...

chanach.. :)

Mohan Lele said...

ताई, आपण दिल्लीत व अमेरिकेत राहून एवढे शुद्ध मराठीत लिहिले आहे,खरच कौतुकास्पद आहे.मराठी बाणा आणि आता मराठी वाणी परदेशातही रुजते आहे. नक्की लहानपणी भरपूर बाराखडी आणि शुद्धलेखन लिहिले असणार! भाषेचा बाजही कोमल आणि नेमकाच आहे. सर्वच कविता फारच छान!मनाच्या भावनांना निसर्गाच्या रुपातून सहजपणे व्यक्त केलय.

Unknown said...

अप्रतिम...........

Unknown said...

खुपचं सुंदर कविता आहे.. अगदी त्याच "भावविश्वात" घेउन जाते, तेच वातावरण जिवंत होउन जाते. त्याचबरोबर तिला सुरेल गेयताही आली आहे.
अश्याच लिहीत रहा, पुढ्च्या काव्यलेखनासाठी मनभरुन शुभेछा!