Saturday, September 22, 2007

सायंकाळी



सायंकाळी
कोण्या एका सायंकाळी,
संध्येच्या रंगीत छटा त्या
रांगोळीच्या प्रतिमा ,सागर
लाटांवरती उभवित होत्या

अन त्या रंग छटा गालांवर
तुझ्या ही प्रिये उमलत होत्या
होता हा संध्या प्रताप की
निसर्ग प्रेमा फुलवित होता

घरट्याला परतती पाखरें
चिवचिवाट तो त्यांचा कानी
अन तू हळुच दिलेली मजला
त्या समयी ती प्रेम निशाणी

अन त्या सागर लाटांवरती
मिळून दोघे होतो विहरत
अस्फुट अस्फुट गोड गोड तू
होती बोलत लाजत लाजत

काय बोल होते ते तेंव्हा
ऐकत कान जिवाचा करुनी
होतो मी, पण डोळे माझे
तव चेहेय्रावर होते खिळुनी

चेहेय्रा वरचे भाव निरखता
मन माझे ही रंगत गेले
मी पण ह्रुदय आपुले हळवे
अलगद तुझिया हाती दिधले


त्या प्रेमाची अशी सांगता
होइल वाटत नव्हते कधिही
तू अन मी पती पत्नी झालो
आवडले नियतीला हे ही

पती पत्नी होताच मिळाले
हक्क एकमेकां छळण्याचे
दुसय्राचे अधिकार तुडवुनी
अपुले प्रस्थापित करण्याचे

त्या नाजुक हळुवार भावना
संसृति तापे करपुन गेल्या
दूध चहा साखर अन भाजी
पै पाहुणा आला गेला

रेशन राकेलाच्या रांगा
बस गाडीची धक्का बुक्की
संध्याकाळी घरी येताना
मरगळली तू चुरगळला मी

हिशेब पै पै चा जोडुनि
हाती कधिहि न काही आले
अधल्या, चवल्या, अन आणेल्या
रुपये कुठले कधीहि न उरले

आज अचानक सायंकाळी
गॅलरीत कपबशा घेउनि
संध्या-रंग समोर विखुरले
चहा पीत असता तू अन मी


लाल, गुलाबी अन सोनेरी
कुठे मधूनच धूसर धूसर
बघता बघता गत काळाशी
मन माझे एक रूप झर झर

अन त्या ओल्या जुन्य भावना
पुन्हा नव्याने उसळुनि आल्या
अन प्रेमाने हाती घेउनि
हात तुझा मी उगा दाबला

No comments: