ज्ञाता कडून अज्ञाता कडे गेलेला
कोणचं असेल ते वाहन जे नेईल गंतव्या कडे
तिथे जाणारे रस्ते असतील सरळ की वाकडे
प्रकाश असेल का वाटेत कि असेल फक्त अंधार
शून्यच असेल कि असेल एखादा तरी विचार

भेटतील का तिथे ती सारी जी गेलीत जिवाला चटका लावून
कि होत्याच्या नव्हत्यात जाईन मी ही विरून
अन् तो भेटेल का तिथे मला, तो ज्ञानोबाचा विठ्ठल
तो व्यासांचा कृष्ण तो रखुमा देवीचा वर
ज्यानी सांगितलंय गीतेत कि सारे त्याच्याच कडे येतात
माना वा न माना त्याच्यातच विलय पावतात