वसंतफुललेले उपवन, सुगंधी पवन
मधुकर गुंजारव, पक्षांचे आरव
प्रेम उपासना
हिरव्याची उधळण, रंगांची पखरण
वारा वासंती, राग मधुवंती
आलाप अन् ताना
मदनाचे बाण, युगुले रममाण
लेवुनिया साज, आला ऋतुराज
कार्य संचालना
ग्रीष्म गरम गरम झळा, रणऱणतं ऊन
लाल लाल सूर्य पांढरा होऊन
घालतोय धिंगाणा
संत्रस्त धरणी, अशी याची करणी
ओसाड विहिरी, रिकाम्या घागरी
पाण्याचा ठणाणा
तापलेल्या वा़टा, झाड न फाटा
घामाच्या धारा, भिजलेला सदरा
झिजलेल्या वहाणा
वर्षासर सर धारा, सोसाटयाचा वारा
मंद मृद् गंध, पाण्यावर तरंग
अनिवार भावना
ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट
नदीला पूर, पाणी सर्व दूर
वादळी गर्जना
चालले वाहून दुथडी भरून
पाठारे बांध, वाहतूक बंद
माणसांची अवहेलना
शरदसंथ संथ धारा, मंद मंद वारा
नदी नाले शांत, सागर प्रशांत
सुखाची कल्पना
पूर्ण चंद्र बिंब, समोरचा लिंब
अमृत कण, चांदण्याची उधळण
धुंदीची कामना
ह्रुदय आतुर, मनांत काहूर
मनाचा हव्यास, प्रियाची आस
अस्फुटशी वेदना
शिशिरआंगभर शिरशिरी, थंडी बोचरी
गरम गरम चहा, साय्रांना पहा
पुरतो आहेना
ऊबदार दुलई, दुधावरची मलई
कोमट ऊन, चटई घालून
जरा वेळ बसाना
शाल अन् स्वेटर जोडीला मफलर
मिळतो कुणाला, सदरा जरी असला
खूप झालं म्हणाना