Tuesday, October 9, 2007

प्राजक्त , इच्छा

प्राजक्त

सहवास चांदण्यांचा मृदु-गंधयुक्त होई
या धुंद उष:काली प्राजक्त दान देई
दारी घरी पडे हा नव गालिचा फुलांचा
देहावरी फुलांची बरसात नित्य होई ।


पुष्पें नव्हेत ही तर आरास चांदण्यांची
का भूषणेंच पडती स्वर्गातल्या पय्रांची
ही ठेव देवतांची मनुजास प्राप्त होई
स्वप्नातलीच सृष्टी का वास्तवात येई ।

शुभ्रात केशरी हा मिसळून रंग जातो
मोत्यांत पोवळ्यांचा आभास सत्य होतो
मातब्बरी कशाची मग भूषणांपुढे ह्या
हे दान पदरी माझ्या बघ मावणार नाही ।

शृंगार हा शिवाचा उपहार पार्वतीला
स्वर्गीय देवतांचा आशीष हा धरेला
नंदन-वनांतुनीच हा उपवनात येई
अंगणात रुक्मिणीच्या परिजात वृष्टी होई ।इच्छा

वाय्राच्या वेगानं येऊन झपाटून टाकावं त्यानं मला
अगदी म्हणतात ना तसं उचलावं ऑफ माय फीट
गच्च गच्च घ्यावं मिठीत
अन् दिठीत मिळवावी दीठ
काय होतय ते कळण्या आधीच
घ्यावे कब्जात देह अन् प्राण
त्याच्या कवेत मी पडून राहावं
होऊन बेभान, नीरव, निश्चल, निष्प्राण

1 comment:

Arvind Chaudhari said...

आशाताई,
वा !

काय होतय ते कळण्या आधीच
घ्यावे कब्जात देह अन् प्राण
त्याच्या कवेत मी पडून राहावं
होऊन बेभान, नीरव, निश्चल, निष्प्राण
...खरेच हो तुमचे म्हणणे..
...खुप मनाला भिडणारी कविता
.मेरा सांवरा निकट हो जब प्राण तन से निकले..
..लाईक धीस