Tuesday, October 9, 2007

मना


माझ्या रे चंचल मना
नको होऊ सैर-भैर
थांब क्षणभर इथे
चित्त करूनिया स्थिर ।
भार प्रपंचाचा किती
वाहशील रे उगाच
त्याच्या प्रश्नांचा गुंता
सोडविता तुला धाप ।
माझे माझे करूनिया
किती जोडशील वित्त
सोड सर्व राही इथे
नको त्यांत लावू चित्त ।
ह्या देहाला जगवाया
पुरे दोनच भाकरी
नको व्यर्थ आटापिटा
नको कुणाची चाकरी ।
गेला जन्म उठाउठी
आता तरी लाव ध्यान
त्या परम ईश्वरात
तोच तुझं राखी भान।
त्याच्यातच हो रे दंग
त्याचेच करी भजन
त्याचेच तू गा अभंग
दिन रातीचं स्मरण ।
असं जेंव्हा करशील
तोच करील सांभाळ
सुखी अखंड होशील
त्याचेच तू होई बाळ ।

No comments: