आठवणींच्या रिमझिम धारा
देती तप्त जिवा थंडावा
त्यातच मग हरवून जाता
वर्तमान कां नच विसरावा
बालपणीचे घरकुल अपुले
आई दादा ताई भाई
आणि छबकडे मिंदू नाना
गडबड बडबड घाई घाई
मी अन अण्णा अधले मधले
कुणी ही थापटा असले तबले
पण त्या कडुलिंबी फांदी ला
लोंबत असत मधाचे बुधले
ते बालपण ती तरुणाई
नव्या नव्या ची किती नवलाई
शाळा संपुन कधी उगवली
कॉलेजाची अपूर्वाई
ती कॉलेजाची नवलाई
कळले नाही कधी संपली
कधी सीनीयर झालो आम्ही
अन् पदवी ही हाती पडली
अन् पदव्युत्तर वधू परीक्षा
तीही पडली पार कधीची
सून, नववधू , काकू, वहिनी
नवीन नातीं नव जन्माची
नवरा,सासू तान्ही बाळें
उस्तवारी करणें सगळ्यांची
त्याच मधे मग हरपुन गेली
गंमत जंमत ती रात्रींची
हे सगळे करताना आले
नोकरी चे ते जू मानेवर
कधी स्वत: मी अडकवले ते
माझे मला न कळे आजवर
शिक्षण अन् लग्ने ही मुलांची
झाली ती थाटामाटाने
ती ही पाखरें उडून गेली
अपुल्या अपुल्या नव वाटेने
आज अता निवांत लाभता
आम्ही दोघे सायंकाळी
आठवीत बसतो त्या गोष्टी
घडल्या होत्या ज्या सकाळी
संसृतिच्या स्थूलांत कधी कधी
स्मृति मधाचे बिंदु चाखतो
गोडी मध्ये आठवणींच्या
दोघे मग हरवून जातो.
Friday, September 5, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
ही कविता नसून माणसाच्या आयुष्यातल्या वाटचालीचा काव्यरूपी सांरांश आहे असं वाटतं.
पण त्या कडुलिंबी फांदी ला
लोंबत असत मधाचे बुधले
मस्तच!
एकंदरीत कमीअधिक फरकाने असं असतं का प्रत्येकाचं आयुष्य?
Thanks prashant
तुम्हाला साखळी हायकूसाठी खॊ दिलाय बघा.
आशाताई कित्ती सुरेख लिहिता हो तुम्ही. कविता वाचतांना आईच आली डोळ्यासमोर....
Post a Comment