आषाढी कार्तीकी भक्तजन येती, त्या वारीचं आकर्षण लहानपणा पासून होतं असं म्हणता
येणार नाही, कारण बालपण, तारुण्य अन् मोठेपण सर्वच महाराष्ट्राच्या बाहेर गेलं.
नास्तिक मात्र नव्हते. माहेरी घरांत गोकुळ अष्टमी दणक्यात साजरी व्हायची. सासरी गणपती.
पण संत वाङमयातून घडलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाने विठ्ठलाचं कुतुहल मात्र खूप होतं.
वारीला गेलेल्या लोकां कडून वारी विषयी ऐकतांना वाटायचं निसंगपणाचां किती छान अनुभव
असेल हा. अन् विनम्र होण्याची तर अपूर्व संधी कारण आपलं असं काहीच न्यायचं नसतं म्हणे.
पण तो योग तर आलाच नाही पुढे कधी आला तर कुणास ठाऊक .
विठ्ठलाचं ते आकर्षण मात्र आजही कायम आहे.माझे माहेर पंढरी हा तुकारामांचा
भीमसेनां नी गायलेला अभंग ऐकला कि जीव हेलावून जातो. पंढरपूर ला मात्र दोनदा जायचा योग आला.
बडग्यांचा मात्र आम्हाला अजिबात त्रास झाला नाही. तुळशी माळ हातात घेऊन रांगेत उभं असतांना
इतकं प्रसन्न वाटत होतं. पाय मुळीच दुखले नाहीत अन् नंबर लागल्यावर विठूच्या पायावर डोकं ठेवून
अगदी भरून आलं. पण रखुमाई विठ्ठलाजवळ नव्हती. ती दुस-या देवळांत आपल्या विठोबा पासून दूर असते.
स्त्री मुक्ती प्रकार तेंवहा पासूनच चालू झाला होता कि काय. विठ्ठलाच्या देवळात एक चांदीचा खांब आहे
त्याला कवेत घेऊन अगदी गळाभेट देता येते. मी विठ्ठलाला भेटणयाची ही संधी अर्थातच् सोडली नाही.
ज्ञानेश्वरीचं हस्तलिखित ही तिथेच ठेवलेलं आहे. ज्या वास्तूला ज्ञानदेव तुकाराम वगैरे मंडळींचे पाय लागले
त्याच वास्तूत आपण आत्ता उभे आहोंत ही कल्पनाच किती छान आहे मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव काय वर्णावा.
नामदेवांच्या हातून तर विठू माउली खात ही असे. अन् जनाबाईला घरकामांत मदत करणारा तो हाच. असा हा
सामान्यांना असामान्य बनविणारा विठ्ठल मनांत नाही वसला तरच आश्चर्य. नेहेमी जवळचा वाटणारा विठ्ठल
तुकारामांना कधी कधी मात्र कानडा (समजायला कठिण) वाटतो. अन् कधी कधी अगदी मित्र कि ज्याच्यावर त्यांना
रागावता ही येतं.
एवढ्या प्रसिध्द मंदिराच्या आसपासचा परिसर अन् चंद्रभागा नदी मात्र अगदी गचाळ आहे. त्यामुळे
मन कुठेतरी खट्टू होईन जातं. पण मनांत त्या विठ्ठल भेटीचं सुख ही बरोबर असतंच.